सृजनेतेचा आनंद
सृजनेतेचा आनंद
काल रात्री अचानक एकीचा फोन आला आणि पलीकडून फक्त रडण्याचा आवाज. कोण आहे हे कळले होते, काय झालय तेही न बोलता कळले होते, आता पुढे काय हाच प्रश्न होता.
मी अनेक सेवा क्षेत्रातील किशोरी विकास कार्यक्रमाचे, अभ्यास गटाचे, अभ्यास काय असतात हे मध्यंतरी वाचत होते आणि सगळीकडे पाळी हा विषय अधिक विस्तृत प्रमाणात सांगितला होता. त्यातील शास्त्र हे मुलीना माहिती होतच असते, लहानपणापासून घरातील आई, बहिण, आजी, मावशी, काकू अशा सगळ्यांकडून कळलेले असते. भारतात तर त्याला प्रत्येक प्रांतात एक वेगळे उत्सवाचे स्वरूपही असते.
पहिली पाळी वय १२ ते १६, सध्या अजून थोडे लहान वयात येते. शास्त्रीय रित्या पहिले तर एवढे काय कौतुक, मुलगा वयात येतो तेव्हा त्याचे कुठे करतो कौतुक. तो काय वयात येतो, चिडचिड करतो , थोडेसे रागवणे आणि मग खरंच मोठा होतो आणि कधीतरी आईचीच काळजी घ्यायला लागतो.
पण मुलगी वयात येणे हा उत्सव आहे. भारतात मध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रथा आहेत. प्रत्येक देशाची अशी वेगळी पद्धत आहे.
पूर्वीच्या काळी हेच तिच्या लग्नाचे वय होते त्यामुळे अजूनच वेगळी गडबड किंवा लग्न झालेले असेल तर माहेराहून सासरी जातानाची एक वेगळी रुख रुख. ते अंगण, ते सागरगोटे, तो झोपाळा, झिम्मा, फुगडी असे सगळे बंद किंवा घराच्या आतल्या कोपर्यात.
कर्नाटकात एक मोठा कार्यक्रम, पत्रिका वाटप, हळदीच्या पाण्याने अंघोळ, तिला भरपूर फळे, योग्य आहार, सिल्क साडी आणि दागिना अशी भेटवस्तू देऊन साजरा करतात.
आंध्र प्रदेश मध्ये देखील पहिला दिवस आणि पाचवा दिवस अतिशय आनंदाने साजरा करतात. पहिल्या दिवशी पवित्र स्नान, आई सोडून पाच सवाष्णी कडून घातले जाते. पाचव्या दिवसा पर्यत वेगळे ठेवून तिला उत्तम आहार, बाहेर फिरायला न पाठवता घरातच काळजी घेतली जाते आणि पाचव्या दिवशी चंदनाचा लेप लाऊन अंघोळ, साडी, दागिने आणि इतर भेट वस्तू देऊन सोहळा केला जातो.
आसाम मध्ये देखील ४ ते ७ दिवस वेगळे ठेवून शेवटच्या दिवशी हळदीचा लेप लाऊन स्नान, विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन हा सोहळा साजरा करतात.
गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार प्रत्येक राज्यांमध्ये हा सोहळा असतोच. महाराष्ट्रात पण तिला गरम पाण्याने स्नान, तिची ओटी भरून विविध भेटवस्तू देऊन मुलीचे कौतुक केले जाते.
हे कौतुक त्या एका मुलीचे स्त्री मध्ये झालेल्या बदलाचे असते. तिच्यातील सृजनेतेचे कौतुक असते.
पण आई कुठेतरी रडत असते, मी जे भोगले आहे ते माझ्या मुलीला भोगायला लागू नये, ह्या नर राक्षसांच्या जगात हिला सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना ती करत असते.
कालचा फोन मला हेच सांगण्यासाठी आला होता. माझ्या मुलीला पाळी आली. जिला काहीही स्वतःचे स्वतः करता येत नाही, सगळ्या गोष्टींसाठी आई किंवा भावा वर अवलंबून आहे तिला पाळी आली. कसे समजावयाचे, ती सारखी सांगत होती ओले वाटते, शु होत आहे. पण बाई ही ओल तुला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे. तुला कळत नसले काही तरी तू बाई झाली आहेस.
बाई !!!!! काय आहे हे बाईपण? कोणी सांगेल का हिला...
आईच्या फोन वरच्या रडण्याबरोबर बरोबर माझेही डोळे वाहू लागले. माहित होते हा प्रसंग येणार आहे, मनाची तयारी होती. पण वाटले मी हरले हे सगळे माहित असताना देखील मी योग्य ती माहिती आई पर्यत नाही पोहोचवू शकले.
वैदेहीने दुपारी विचारले तू तयारी करू शकली नाहीस ह्याचे वाईट वाटून रडू आले कि तिला पाळी आली ह्याचे रडू आले. खरे सांगायचे तर तिला पाळी आली आणि तिला त्यातला आनंद कळणार नाही ह्याचे, उद्या तीला कोणी त्रास दिला तर ह्या भीतीने, आई ऑफिसला जाताना किती मनावर ओझे घेऊन जाईल त्याचे, आणि योग्य प्रकारे माहिती देऊ नाही शकले ह्याचे.
ह्या सृजनतेचा आनंद प्रत्येकीला मिळावा पण असे वाटते. निसर्ग असा कसा? देताना असे अर्धवट तरी का द्यावे?
अर्थात हा आनंद साजरा करणार आहेच मी तिच्या घरी जाऊन.

Comments
Post a Comment